हिंगोली – ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही जनतेने विशाल पाटील यांना निवडून दिले त्याचप्रमाणे या निवडणुकीत माझ्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर जनता प्रचंड मतांनी मला विजय करून देईल असा विश्वास व्यक्त करताना अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जाहीर सभेतून विरोधकांवर जोरदार टीका केली.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शहरातून भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीचा समारोप इंदिरा गांधी चौक येथील सभेमध्ये करण्यात आला. या सभेत आपले भाषण करताना भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तानाजी मुटकुळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यावर सडकून टीका केली.
भाषणाच्या सुरुवातीला उमेदवारीच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करताना आम्ही देखील भाऊ तुम्हाला साथ देऊ असा शब्द दिला होता. मी प्रामाणिकपणे लोकसभेमध्ये काम करून नागेश पाटील आष्टीकर यांना मताधिक्य दिले आणि इथेच माझी चूक झाली. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना महाविकास आघाडीमध्ये पूर्वीप्रमाणे हे मतदारसंघ असणे आवश्यक होते. परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी ही जागा घेतली. जे संपर्कप्रमुख बबन थोरात व नागेश पाटील आष्टीकर लोकसभेच्या वेळेस माझ्याकडे आले होते त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा होता. त्यांनी माझा एक प्रकारे विश्वासघातच केला. माझ्या राजकारणाची सुरुवात अपक्ष म्हणून झाली त्यानंतर जनतेने मला सलग तीन वेळा आमदार म्हणून या मतदारसंघात संधी दिली. राजकीय घडामोडी मध्ये जरी माझ्यावर अन्याय झाला असला तरी आजही जनता माझ्या पाठीशी असून सांगली पॅटर्न प्रमाणे मीच सर्वाधिक मतांनी विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधकांवर टीका करताना गोरेगावकर म्हणाले की आजही माझ्याकडे माझी वडिलोपार्जित जमीन आणि घर आहे. परंतु काही जणांची दहा एकरची दोनशे एकर आणि 40 कोटींचा बंगला कसा बांधला गेला हे समजले नाही.
साहेबराव पाटील गोरेगावकरांनी इंदिरा साखर कारखान्याच्या नावाखाली मतदारसंघातील शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा चढविला होता. मी आमदार झाल्यानंतर यातून शेतकऱ्यांना बाहेर काढले. माझ्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सर्वाधिक संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी जे 32 हजार होते त्यांना लाभ मिळवून दिला. परंतु मुटकुळे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्व सदरील निराधार यांची नावे वगळून त्या प्रकरणात माझ्यावरच गुन्हा दाखल केला. जनतेसाठी मी असे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहे. महायुतीच्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळामध्ये महागाई प्रचंड वाढली. शेतीसाठी लागणारे खते बी बियाणे महाग झाले. परंतु शेतमालाला मात्र भाव मिळाला नाही. ज्यांनी पदयात्रा काढून आपण शेतमालाला भाव देऊ अशा घोषणा केल्या होत्या त्यांनी उलट भाव कमी करून टाकले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येण्याचे वेळेलाच हे सरकार बाहेरून आयात सुरू करते ज्यामुळे शेतीमालाचे भाव पडतात. त्यामुळे अशा फसव्या महायुतींच्या सरकारवर लाथ मारायची वेळ आली आहे. साडेसात वर्षाच्या सरकारची साडेसाती घालवून टाकण्यासाठी मतदारांनी मतदान करावे. मी अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यानंतर घाबरलेल्या काही जणांनी मी मॅनेज झाल्याच्या अफवा पसरविल्या. परंतु भाऊ पाटलाला अजून विकत घेणारा कोणीही आलेला नाही. या जनतेचा विश्वासावर मी निवडणूक लढवत आहे आणि माझ्या टेबल चिन्हावर मतदान करून हीच जनता मला प्रचंड मतांनी निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला बुऱ्हाण पैलवान, रिपाईचे मधुकर मांजरमकर, शेख नईम शेख लाल, द्वारकादास सारडा, पवन उपाध्याय, भास्करराव बेंगाल यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.