Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्यासरकारनं दिलेलं आरक्षण 'या' कारणामुळं सर्वोच्च न्यायालयातून रद्द; वक्कलिग, मराठा समाजात तीव्र...

सरकारनं दिलेलं आरक्षण ‘या’ कारणामुळं सर्वोच्च न्यायालयातून रद्द; वक्कलिग, मराठा समाजात तीव्र नाराजी

सोलापूर : व्यवसाय व सांस्कृतिकदृष्ट्या कर्नाटकातील वक्कलिग (Vokkaliga Kunbi) व महाराष्ट्रातील मराठा समाज (Maratha Community) एकच आहे. भाजप सरकारने (BJP Government) वक्कलिगा समाजाला दिलेले दोन टक्के आरक्षण काँग्रेस (Congress) सरकारने रद्द केले. तर भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले एसईबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अयोग्य ठरविले.

दोन्ही राज्यात राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या या समाजात सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. कर्नाटकातील वक्कलिग व महाराष्ट्रातील मराठा हे दोन्ही समाज राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. केवळ म्हैसूर, मंड्या, हासन व बंगळुरू या चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या वक्कलिगांची लोकसंख्या ८.०२ टक्के आहे.

मात्र, सध्या त्यांचे ५४ आमदार असून, डी. के. शिवकुमार यांच्या रूपाने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. हनुमंतय्या, एस. एम. कृष्णा, सदानंद गौडा आदींनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. तर ३२ टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाकडेच बहुतांश काळ राज्याचे नेतृत्व राहिले आहे.

सध्या १०० मराठा आणि २० कुणबी आमदार आहेत; तर २१ मराठा आणि ४ कुणबी असे २५ खासदार आहेत. मात्र, राजकीयदृष्ट्या ताकदवान असले तरी हे दोन्ही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे दोन्ही सरकारांनी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातून समोर आले आहे.

त्यामुळे दोन्ही सरकारांनी वक्कलिग, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले. परंतु वेगवेगळ्या कारणांनी ते हिसकावले गेले. कर्नाटकच्या बसवराज बोम्मई सरकारने आधी थ्री ए मध्ये असलेल्या वक्कलिगांचा टू सी हा प्रवर्ग तयार करून दोन टक्के आरक्षण दिले. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने ते रद्द केले.

तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तयार करून आरक्षण दिले. मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या टक्केवारीत शिक्षणासासाठी १२ आणि नोकरीत १३ टक्के असा फेरबदल करीत ते वैध ठरविले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ते अयोग्य ठरवल्याने ते रद्द झाले. त्यामुळे दोन्ही समाजात सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. इतकेच नव्हे तर नेतृत्वाने आजपर्यंत समाजाची फसवणूक केल्याची भावना दोन्ही समाजात निर्माण झाली आहे.

व्यवसाय व सांस्कृतिकदृष्ट्या मराठा व वक्कलिग एकच आहेत. दोन्हींचा व्यवसाय शेती, पशुपालन असून, दोघेही लढाऊ आहेत. मराठा शिवपूजक, तर वक्कलिग शिवाचेच अवतार असलेल्या भैरवाची आराधना करतात. ते आदिचुंचनगिरी मठाचे निर्मलानंदगिरी यांना मानतात, तर छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चलगिरी महाराज यांना मानायचे. शहाजीराजेंच्या पुढाकाराने बंगळुरूत स्थापन झालेल्या गोसावी मठाचे उत्तराधिकारी याच मठाचे आहेत. अशाप्रकारे दोन्ही समाजात अनेक साम्यस्थळे आहेत. मात्र, दोन्ही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत.

-डॉ. सर्जू काटकर, संशोधक, हुबळी, कर्नाटक.

वक्कलिग व मराठा हे समाज शैक्षणिदृष्ट्या मागासलेले आहेत. काबाडकष्ट करून जगाला अन्न पुरवतात. मात्र, राज्य सरकारची भूमिका या समाजाच्या विरोधात आहे. विशेषतः कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भूमिका वक्कलिग समाजविरोधी आहे. कोणत्याही अप्रगत समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष योग्य नाही.

-प्रशांत गौडा, बंगळुरू.

वक्कलिगचा मराठीत शब्दशः अर्थ कुणबी होय. केवळ शेती असणाराच नव्हे, तर शेतात मोलमजुरी करणाराही कुणबी आहे. सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण जाणून आरक्षण द्यावे. तसेच शैक्षणिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनीही त्यासाठी औदार्य दाखवायला हवे.

-अतुल जाधव, जाधवगड, अक्कलकोट.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments