Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. पालिकेच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ लवकरात लवकर सुरू करावी, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणींबाबत माहिती घेतली. रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनास दिले.
रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर सेंटर, कान-नाक-घसा विभाग, तातडीची वैद्यकीय सेवा आणि इतर विभागांप्रमाणे स्वयंपाकगृहालाही भेट देत मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. रुग्णालय आवारात बांधकाम सुरू असलेल्या विस्तारित इमारतीची त्यांनी माहिती घेतली. अहोरात्र काम करत लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सुविधा वाढवण्याच्या सूचना
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सुमारे दोन हजार रुग्णशय्यांची क्षमता असलेली नवीन इमारत पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर शीव रुग्णालय तीन हजार बेडची क्षमता असलेले सर्वात मोठे रुग्णालय ठरेल.
अतिदक्षता विभागाची क्षमता दोनशे रुग्णशय्यांची असावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, डायलिसिस आदी विविध सुविधा वाढवण्याच्या सूचनाही महापालिका प्रशासनास केल्या असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.