लाखोंचा जनसमुदास उपस्थित राहणार, 110 एकरवर सभा,
हिंगोली :
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी डिग्रस कर्हाळे फाटा येथे 110 एकरवर सभा पार पडणार आहे. या विराट सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याची सभा डिग्रस कर्हाळे फाटा येथे 7 डिसेंबर रोजी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला मनोज जारांगे पाटील हिंगोली येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत, यावेळी दोन क्रेनच्या माध्यमातून 2 क्विंटलचा हार घालण्यात येणार आहे. तसेच 101 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 110 एकवर ही सभा पार पडणार असून सभेसाठी 40 बाय 20 व 12 फुट उंचीचे मुख्यस्टेज तयार करण्यात आले आहे. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 फुट उंच पुतळा ठेवण्यात येणार आहे. स्टेज भोवती 50 फुटांचा डि झोन तयार करण्यात आला असून दुसर्या स्टेजवर सभा सुरू होण्यापुर्वी पोवाडे व निवडक मुलींचे भाषण होणार आहेत.
या सभेसाठी 200 भोंगे, आठ डी.जे.बॉक्स, 300 फोकस, सहा ड्रोन कॅमेरे, आठ एलईडी वॉल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निगराणी ठेवण्यासाठी चार टेहळणी टॉवर, सहा मुख्यप्रवेशद्वार असे स्वरूप असणार आहे. सभा सुरळीत पार पडावी यासाठी पाच हजार मराठा सेवक ( स्वयंसेवकांची ) नियुक्ती केलेली आहे. दोन वेळेस प्रशिक्षण देऊन प्रत्येक स्वयंसेवकांना ओळखपत्र व टिशर्ट दिले जाणार आहे. 50 विविध ठिकाणी या स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व स्वयंसेवकांना सभेच्या एक दिवस अगोदर 6 डिसेंबर रोजी मुक्कामी सभास्थळी बोलावण्यात येणार आहे. त्याचबरोबर 4 लाख पाणीबॉटल व 50 टॅंकरद्वारे फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा ठिकाणी समन्वयरावा म्हणून 50 वाकी टाकीची व्यवस्था आहे. 150 एकरवर पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून पार्किंगस्थळी व इतर ठिकाणी असे 40 अन्नछत्राचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये खिचडी, पुरीठेचा, चपाती ठेचा, चिवडी, उपमा अशा प्रकारे 300 क्विंटलचे अन्नछत्र राहणार असून याशिवाय बिस्कीट पुडे व केळीचेही वाटप करण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जनसमुदायाचा विचार करता तज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसह सुसज्ज असे मेडिकल कॅम्प विविध पाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकुण 400 डॅाक्टर्स व सहयोगी कर्मचाऱ्यांसह असणार आहेत. तसेच 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 रूग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक झोन नंतर 30 फुटाचे आपत्कालीन रस्ते तयार करण्यात आले आहेत. 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत. महिलांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावोगावी जनजागृती व्हावी यासाठी मराठा समाज बांधवांच्या घरोघरी जावून 3 लाख मुळपत्रिका वाटण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लहान – मोठे 400 बॅनर जिल्हाभरात लावण्यात आले आहेत.
या सभेसाठी 12 विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा कार्यवाहक समिती, प्रशासकीय जबाबदारी समिती, प्रसिद्धी प्रमुख समिती, स्टेज व ग्राऊंड समिती, साऊंड सिस्टीम व फोकस समिती, आरोग्य विभाग समिती, स्वयंसेवक नियंत्रण व समन्वयक समिती, पिण्याचे पाणी नियोजन समिती, पार्किंग नियोजन समिती, बॅनर समिती, अन्नछत्र विभाग समिती, स्वच्छता विभाग समिती, विद्युत पुरवठा जनरेटर समिती, हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा अभिवादन समिती अशा विविध समितीच्या माध्यमातून या विराट सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने 5 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.