राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अशातच सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं.
विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहेत. पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
सभागृहात नेमकं काय झालं?
सतेज पाटील हे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथी सस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावर बोलत होते. पाटील म्हणाले, “पीएचडी करू इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे.” त्यावर अजित पवार म्हणाले, “फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत?” त्यावर सतेज पाटील म्हणाले, “हे विद्यार्थी पीएचडी घेतील.” पाटील यांचं उत्तर ऐकल्यावर अजित पवार म्हणाले, “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत?” अजित पवारांच्या या प्रश्नाचा सतेज पाटलांना आधी धक्का बसला. सतेज पाटील यांच्या शेजारी बसलेल्या आमदार भाई जगतापांनी तर डोक्याला हात लावला. त्यानंतर ते म्हणाले, दादा असं काय म्हणताय तुम्ही, या योजनेमुळे राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही.
सतेज पाटील म्हणाले, केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार अशी अट तुम्ही (राज्य सरकारने) नंतर लावली. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याआधी तुम्ही हे सांगायला हवं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली, तुम्ही कट ऑफ डेट जाहीर केली आणि आता राज्य सरकार केवळ २०० फेलोशिपची अट ठेवत आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. तसेच आमची मागणी आहे की, तुम्ही ही अट पुढच्या वर्षीपासून लागू करा.
काय म्हणाले अजित पवार?
सतेज पाटलांच्या मागणीवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आम्ही यावर फेरविचार करू. त्यांची मागणी मान्य होईल असं सांगता येत नाही. गरजेचं असेल तर सहानुभूतीपूर्वक विचार करू. मला असं वाटतं की, या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह, आयएएस, आपीएस, आयआरएस, आयएफएससह इतर स्पर्धा परिक्षांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यंदा एमपीएसी, यूपीएससीत आपल्या पोरांनी मोठं यश मिळवलं. या परिक्षांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, खारघर (नवी मुंबई) आणि नाशिकमध्ये आपण सारथीचं केंद्र उभं करणार आहोत.