हिंगोली – मी आमदार असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघातील 35 हजार महिलांना निराधार योजनेचा न्याय मिळवून दिला होता. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांनी सदरील लाभार्थ्यांची नावे कमी करून टाकली. जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यानंतर या सर्व निराधारानां पुन्हा न्याय देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी नरसी नामदेव येथे बोलताना केले.
हिंगोली विधानसभा निवडणुकीत टेबल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवीत असलेले अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज संत नामदेव महाराज यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन नरसी नामदेव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील अनेक महिलांनी आम्हाला निराधार योजनेचे मानधन बंद झाल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या गोरेगावकर यांनी माझ्या कार्यकाळात 32 हजार निराधार महिलांना मानधन दिल्या जात होते. परंतु त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा तपासणीच्या नावाखाली या लाभार्थ्यांची नावे कमी करून टाकली. त्यामुळे निवडून आल्यानंतर मतदार संघातील सर्व निराधार महिलांना त्यांचा भाऊ म्हणून पुन्हा मानधन सुरू करण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.