Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याडबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'वंचित'कडून लोकसभा लढवणार? प्रकाश आंबेडकरांकडून पाटलांना चर्चेसाठी...

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ‘वंचित’कडून लोकसभा लढवणार? प्रकाश आंबेडकरांकडून पाटलांना चर्चेसाठी निमंत्रण!

सांगली : महाविकास आघाडीसमवेत जागावाटपाच्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघावर (Loksabha Elections) ठाम दावा केला आहे. त्यासाठी उमेदवारीची चाचपणीदेखील सुरू करण्यात आली असून, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

सोमवारी (ता. ८) पुण्यात याबाबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. चंद्रहार यांनी चर्चेला बोलावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोबत यावे, यासाठीही ताकद लावली जात आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणून वंचित बहुजन आघडीकडे पाहिले जात आहे. या आघाडीने सन २०१९ च्या निवडणुकीत चांगली मते घेत काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘बॅकफूट’ला ढकलले होते.

महाविकास आघाडीच्या मतांत पुन्हा फूट पडून भाजपचा फायदा होऊ नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ‘वंचित’ने १२-१२-१२-१२ असा फॉर्म्युला मांडला असून, त्यांच्या बारा जागांच्या यादीत सांगलीचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे सन २०१९ ला ‘वंचित’च्या गोपीचंद पडळकर यांना ३ लाखांवर मते पडली होती, हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. ‘वंचित’कडून उमेदवाराचा शोधही सुरू आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील यांचे नाव पुढे आले आहे. चंद्रहार यांनी काहीही झाले तरी लोकसभा लढवणार असल्याचे आणि सगळ्या पक्षांचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले होते.

वंचित बहुजन आघाडीकडून मला चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांचा प्रस्ताव मी ऐकून घेईन. याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमवेतही माझी चर्चा झाली आहे. मी लोकसभा लढणार, हे नक्की आहे. मला उमेदवारीची जो हमी देईल, त्या पक्षाचा मी विचार करेन.

-चंद्रहार पाटील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments