Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रजातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या 'या' पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या...

जातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या ‘या’ पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या तब्बल 50 हजार प्रती

सांगली : सध्या जातभावना प्रबळ होत असताना १९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लाहोरच्या ‘जातपात तोडक मंडळ’ नावाच्या सवर्ण हिंदूंच्या सुधारणावादी मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी तयार केलेले, पण न झालेले भाषण आज दिशादर्शक असे आहे. त्यांच्या भाषणाचे पुस्तक राज्य शासनाने प्रसिद्ध केले आहे. या भाषणात आंतरजातीय विवाह हे जातिसंस्था निर्मूलनाचे प्रभावी हत्यार आहे, असे ठामपणे नमूद केले. आज ८८ वर्षांनंतर ते प्रकर्षाने दिसून येत आहे.

या भाषणात जातीचे निर्मूलन करायचे कसे, हे कार्यक्रमात ते मांडतात. त्यांच्या मते, जातिनिर्मूलनाची पहिली पायरी पोटजाती निर्मूलनापासून केली पाहिजे. दुसरी पायरी जातींच्या सहभोजनाच्या कार्यक्रमाची सुरवात. तिसरी आणि बाबासाहेबांच्या मते प्रभावी पायरी म्हणजे आंतरजातीय विवाह. बाबासाहेब म्हणतात, आंतरजातीय विवाह हाच जातिअंतासाठीचा प्रभावी मार्ग आहे, अशी माझी खात्री पटली आहे.

केवळ रक्ताची सरमिसळ आप्तस्वकीय असल्याची भावना निर्माण करू शकते. जात मोडण्यासाठीचा खरा उपाय आंतरजातीय विवाह हाच आहे.’’ हे भाषण मुंबईतील भारतभूषण प्रिंटिंग प्रेसने ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ (Annihilation of Caste) या शीर्षकाने पुस्तकरुपात प्रकाशित केले होते. २०१५ मध्ये ते राज्य सरकारने प्रा. प्रकाश शिरसट यांच्याकडून ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या नावाने मराठीत भाषांतरित करवून घेतले. १९३६ ते २०१३ या काळात या इंग्रजी पुस्तकाच्या १४ आवृत्त्या छापल्या आहेत.

या मराठी पुस्तकाच्या ५० हजार २५२ प्रती छापल्या आहेत. आता त्यांच्या १ लाखांवर प्रती खपल्या आहेत. कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात पुस्तक उपलब्ध आहे, ज्याची सर्वाधिक मागणी नोंदवली जाते. सन १९३६ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. राज्य शासनाने अवघ्या पंधरा रुपयांत ते उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक आज सर्व जाती, संघटनांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे असून त्याची अधिकाधिक प्रसिद्धी व्हायला हवी. हे पुस्तक जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी मार्गदर्शक ठरत असून वाचकांना हलवून सोडणारे ठरले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments