देशातील काही राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात देखील मंगळवारी (१९ डिसेंबर) रोजी कोरोनाच्या नवे ११ रुग्ण आढळले आहेत. यापैकी आठ रुग्ण हे राजधानी मुंबईत आढळले आहेत. आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या कोरोना प्रकरणांची संख्या ३५ आहे. यापैकी २७ रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत २७, पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक सक्रिय रुग्ण आहे. तर होम आयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत. तर एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.
मंगळवारी एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाहीये, आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले ८०,२३,४०७ रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाहीये.
सध्या भारतात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन.१ चा पहिला रुग्ण आठ डिसेंबर रोज केरळमध्ये आढळला होता. यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्राने सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.