Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याकाँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

राज्यात काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली आहे व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांची पहिलीच सभा सोमवारी चंद्रपुरात झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.  

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोरवा येथे पंतप्रधानांची सोमवारी सभा झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अन्य नेते उपस्थित होते. अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झाले. अस्थिरता विरुद्ध स्थैर्याची ही लढाई आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. स्थिर सरकारचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेपेक्षा कुणालाच अधिक माहीत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती  तेव्हा त्यांनी अनेक योजना बंद केल्या, असा आरोप मोदी यांनी केला. 

काँग्रेसला कारल्याची उपमा

स्वातंत्र्यापूर्वी देशाची धर्माच्या नावावर फाळणी झाली होती, देश स्वतंत्र होताच काश्मीरची समस्या निर्माण करण्यास, देशातील दहशतवाद, नक्षलवाद, बॉम्बस्फोट आणि दहशतवाद्यांना संरक्षण देण्यास काँग्रेस जबाबदार होती. काँग्रेसने राम मंदिर उभारणीत अडचणी निर्माण केल्या. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू दिला नाही. कारले साखरेत विरघळले किंवा तुपात टाकले तरी ते कडूच राहते, ही म्हण काँग्रेसला शोभते, असे मोदी म्हणाले. आपल्या भाषणाची सुरुवात ‘चंद्रपूरकरांना माझा नमस्कार’ अशी मराठीतून करत गुढीपाडवा व नवीन वर्षांच्या नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फाळणीनंतरच्या मुस्लिम लीगची भाषा आहे, या आरोपाचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी चंद्रपूरच्या सभेत केला. चंद्रपुरातून पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला ही विजयाची नांदी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फडणवीस म्हणाले, की मुनगंटीवारांनी आमदार व मंत्री चंद्रपूरचा कायापालट केला असून आता, दिल्लीत आवाज बुलंद करण्याची वेळी आली आहे.

आठवलेंकडे सपशेल दुर्लक्ष

पंतप्रधानांच्या या पहिल्याच सभेला महायुतीतील घटक या नात्याने रिपाइं (आठवले)चे अध्यक्ष  व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मात्र मोदींनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसले. आठवले यांनी वेळोवेळी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दखल मोदींनी घेतली नसल्याची चर्चा सभास्थळी होती.

काश्मीर पेटत असताना बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात उभे ठाकले होते. बाळासाहेबांचे तेच विचार आता एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments