Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याउल्हासनगर गोळीबार प्रकरण : “महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा...

उल्हासनगर गोळीबार प्रकरण : “महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहण्यास मिळत आहे.

त्याच दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौर्‍यावर होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमधील घटना पाहिल्यावर एकच दिसून येते. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यांचे (भाजपचे) आमदार म्हणतात पोलिसांना मारा, आता तर त्यांचेच आमदार पोलिस स्टेशनमध्ये अधिकार्‍यांसमोर गोळीबार करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. मागील वर्षी देखील गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील व्यक्तींना क्लिन चिट देण्याचं पाप या सरकारने केले आहे. आता तर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार, त्यामुळे याला गँगवार म्हणावं लागेल. आजपर्यंत सिनेमात पाहत होतो. आता ते वास्तवात आणि रस्त्यावर सुरू झाले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आज आपापसात सुरू आहे. उद्या तुम्हाला आणि मला हे लोक गोळ्या मारतील. त्याच बरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे अपयश असून महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही जायचं कोणाकडे असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मी उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणा विरोधात दिल्लीत आवाज उठविणार असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments