केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या मतावर आमचा विश्वास आहे. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करतोय, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.
प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली आहे. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केलं आहे.
देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हाने होती. जनहितार्थासाठी कामे सुरू केली आहेत. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिले. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलतो आहोत. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्राने पुढे जात असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी सांगितलंय.