पुणे – जेवणासाठीचे पैसे वेळत मिळावे, चांगल्या प्राथमिक सुविधा मिळाव्यात, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, अशा मागण्यांसाठी मांजरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील सुमारे ६५० विद्यार्थ्यांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. विविध मागण्यांसाठी तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात असल्याने उपोषणाचे पाऊल उचलत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मांजरी भागात आदिवासी कल्याण विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहे. यामध्ये सुमारे ६०० मुले व २०० हून अधिक मुली आहेत. मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू केली आहे. २०१९ पासून मागण्यांसाठी पाठपुरावा करत असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात विविध कारणांमुळे गैरसोय होत असल्याची त्यांची तक्रार आहे.
त्याचप्रमाणे एमएससीआयटी, टायपिंग आदी कोर्सेस सुरू करावेत, सुरक्षारक्षक, सफाई कामगार पुरविण्यात यावेत, वेळेत प्रवेश द्यावेत, इमारत शासकीय जागेत असाव्यात, मोफत आरोग्य सुविधा मिळावी, आदी मागण्यांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या मागण्या –
– वसतिगृहातील गृहपाल डीबीटी टाकण्यासाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देतात व वेळेत टाकत नाही
– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावी किंवा जेवण पुर्ववत सुरू करावे
– बार्टी व सारथीच्या धर्तीवर देण्यात येणाऱ्या योजना सुरू कराव्यात, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण मिळावे
– गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा
दोन वर्षांपासून वेळोवेळी शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. मात्र त्यात कुठलाही बदल होत नाही. जोपर्यंत अप्पर आयुक्त येत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालू राहील.
– महेंद्र भोये, आदिवासी विद्यार्थी, पुणे