प्रतिनिधी :- शिवाजी कराळे
फाउंडेशन आणि सेवासदन परिवाराची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनींसोबत , दिव्यांग भगिनींसोबत साजरी झाली.सेवासदन मुलांचे वसतिगृह हिंगोली या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनीना माहेरपणासाठी दोन दिवस मीरा कदम आणि धनराज कदम यांनी आणले. पतीचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या जीवनात येणारा संघर्ष, हेळसांड या सर्व मधून कुठेतरी मायेचा ओलावा भेटावा यासाठी दरवर्षी मीरा कदम आणि धनराज कदम या भगिनींना आपल्या कुटुंबात घेऊन येतात . त्यांच्यासोबत दिवाळीचे आनंदी क्षण घालवतात. त्यांच्या अडचणी जाणून घेतात. त्यांना मुक्त असे बाहेरचे अंगण उपलब्ध करून देतात. या भगिनीसुद्धा काही वेळ का असेना पण आपले दुःख या निमित्ताने विसरतात . सेवासदनमधील मुलांसोबत आनंदाने दिवाळी साजरी करतात. या धकाधकीच्या जीवनात कदम दाम्पत्य अशी आगळीवेगळी दिवाळी दरवर्षी साजरी करत आहेत. या भगिनींना दिवाळीच्या निमित्ताने साडीचोळी ,फराळ ,पणत्या असे साहित्य देऊन नंतर त्यांची पाठवणी केली जाते. सगळीकडे आनंदाची दिवाळी साजरी होत असताना ज्यांच्या जीवनात परिस्थितीमुळे अंधार निर्माण झाला आहे अशा भगिनींच्या जीवनात थोडासा प्रकाश देण्याचा कदम कुटुंब प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. साडी ,फराळाचे साहित्य यासाठी समाजातून अनेक हात समोर आले. आणि साथ फाउंडेशन आणि सेवासदन परिवाराची ही आगळीवेगळी दिवाळी हिंगोली येथे संपन्न झाली.या भगिनींची भाऊबीज साजरी करत असताना हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे ,डॉ. श्रीकांत पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी शिवाजी कऱ्हाळे, गोपाल सातपुते, शारदा इंगोले ,अंजली माने, संगीता कदम, पल्लवी गीते , फड सर, गुंजकर सर, आदींनी परिश्रम घेतले.समाजातील ज्या ज्या व्यक्तींनी या दिवाळी उपक्रमासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार धनराज कदम आणि मीरा कदम यांनी व्यक्त केले आहेत.