अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट देखील झालीये. या पावसाने मोहरावर आलेला आंबा, हरभरा तसेच गहू पिकांना नुकसान पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सतत होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, जिल्हा महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. यासह हवामान खात्याकडून तूरळक पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. सायंकाळी व रात्री धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, तिवसा आणि वरूड या तालुक्यांत हलक्या अवकाळी पावसासह काही भागांत गारपीट झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात ४.३ मिमी झाला आहे. तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुली महसूल मंडळात सर्वाधिक १२ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल अंजनसिगी मंडव्यत ४ व तळेगाव मंडळात ५ मिमी पाऊस झालाय. चांदूर रेल्वे व तिवसा तालुक्यातील पाचही महसूल मंडळांत पावसाने हजेरी लावली आहे.
वरूड तालुक्यातील वरूड व वाठोडा मंडळातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसून मंडळनिहाय ही माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. तळेगाव दशासर मंडळात गारपिटीचा तडाखा बसल्याचे सांगण्यात येत आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा इशारा
विदर्भातील वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. तसेच . आज देखील विदर्भात वादळीवारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली (Maharashtra Weather) आहे. विदर्भातील वर्धा, नांदेड, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.