Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्या“२४ डिसेंबरपर्यंत थांबा, माझा बोलविता धनी कळेल”, प्रसाद लाड यांच्या विधानावर जरांगेंचं...

“२४ डिसेंबरपर्यंत थांबा, माझा बोलविता धनी कळेल”, प्रसाद लाड यांच्या विधानावर जरांगेंचं प्रत्युत्तर

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्या मनात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह लावू नका, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंवर टीकास्र सोडलं आहे.

तुम्ही लेकरू लेकरू म्हणत राजकीय ‘ढेकरू’ द्यायला लागला आहात. देवेंद्र फडणवीसांविरोधात बिलकूल भाष्य करू नका, असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहीत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. लाड यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला कोणावरही बोलायचं नाही. २४ डिसेंबरपर्यंत थांबा, आमचा बोलविता धनी कोण आहे? हे तुम्हाला कळेल. थोडा दम धरा… अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. यानंतर आता भाजपा नेते आणि मनोज जरांगे यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

मनोज जरांगेंना उद्देशून भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, “आपणाला मी सांगितलं होतं की, राजकीय भाष्य करून नका. देवेंद्र फडणवीसांविरोधात तर बिलकूल भाष्य करू नका. आपण एक गोष्ट चुकताय, आपण आता राजकीय भाषा करायला लागला आहात. लेकरू लेकरू म्हणत तुम्ही आता राजकीय ‘ढेकरू’ द्यायला लागला आहात. मला वाटतं की हे योग्य नाही. ज्या माणसाने (देवेंद्र फडणवीस) २०१८ मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं, ते आरक्षण कुणामुळे गेलं? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तसेच आपला राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहीत आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments