पुणे : पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोषण आहार आता अधिक पोषक होणार आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस फळे, सोया बिस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे अशा स्वरुपात पूरक आहार देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले.
राज्यात सद्यःस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत.
गोसावी यांनी जिल्हा परिषदांचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे त्याबाबतचे निर्देश दिले. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत आता नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोया बिस्कीट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे अशा स्वरुपात पूरक आहार देण्याबाबत पुन्हा एकदा सर्व शाळा आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना सूचना देण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.