बेस्ट उपक्रमातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (ता. ५) आणि बुधवारी (ता. ६) बेस्ट उपक्रमाकडून विविध प्रकारच्या सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, दादासाहेब फाळके मार्ग, आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि मादाम कामा मार्ग या ठिकाणी ४२७ एलईडी दिवे व चार मेटल हेडलाईट अतिरिक्त दिवे बसवण्यात येत आहेत. बाजीप्रभू उद्यान, ज्ञानेश्वर उद्यान आणि महापौर बंगला या ठिकाणी ३ शोधप्रकाश दिवे विशेष मनोऱ्यांवर बसविण्यात येणार आहेत.
अखंडित विद्युत पुरवठा
मार्गप्रकाश दिव्यांचा विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी दोन जनरेटर शिवाजी पार्क आणि सूर्यवंशी हॉल येथे ठेवण्यात येतील. तसेच एरियल लिफ्ट व त्यावरील कर्मचारी आणि कोएचएफ हे चोवीस तास तैनात ठेवण्यात येतील. महापरिनिर्वाण दिनासंबंधीची माहिती जाहिरातीच्या माध्यांतून दाखविणारे किऑवस चैत्यभूमी येथील विविध ठिकाणी मार्गप्रकाश स्तंभांवर लावण्यात येत आहेत. तसेच ४ ते ६ डिसेंबरपर्यंत शिवाजी पार्क मैदानात वीजपुरवठ्यासाठी एक खिडकी योजना सेवा देण्यात आली आहे.
पथक तैनात
विद्युत सेवा अखंडित सुरू राहावी यासाठी उच्च दाब दोष निवारण अभियंत्यांचे राखीव पथक कँडल रोड, वितरण केंद्र येथे तैनात करण्यात येईल. लघु दाब दोष निवारणाकरिता अभियंत्यांचे राखीव पथक नाना-नानी पार्क येथे तैनात करण्यात येईल. तसेच व्ही. एस. एन. एल. आणि माहीम संग्राही केंद्रातील कर्मचारी वर्गाचे राखीव पथक तैनात केले जाईल.