Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यानौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण, पंतप्रधानांची घोषणा; सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण, पंतप्रधानांची घोषणा; सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

मुंबई : नौदलातील विविध हुद्यांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण करण्याची घोषणा करण्याबरोबरच सशस्त्र दलांमध्ये महिला ‘शक्ती’ वाढवण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या सोहळय़ात दिली.

पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- तारकर्ली किनाऱ्यावर आयोजित केलेल्या नौदल दिनाच्या सोहळय़ात सहभागी झाले होते. एक महिला अधिकारी या वेळी नौदलाच्या जहाजाचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मोदींनी नौदलाचे कौतुक केले. भारतीय नौदलातील विविध हुद्यांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण केले जाईल, असे मोदी म्हणाले.

नौदल दिन सोहळय़ापूर्वी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फुटी पूर्णाकृती पुतळय़ाचे मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या युद्धनीतीची प्रशंसाही केली. ‘‘मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नौदलशक्तीचे महत्त्व जाणून होते. त्यांनी एक मजबूत आरमार स्थापन केले होते. देशातील पहिले आधुनिक नौदल उभारण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. म्हणूनच नौदल अधिकाऱ्यांच्या स्कंदभूषणावर (एपलेटस) छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब कोरण्यात येईल,’’ असे मोदी यांनी जाहीर केले.

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेला भारत गुलामीच्या मानसिकतेला मागे सारून आज सर्व आघाडय़ांवर मोठी घोडदौड करीत आहे. महासागरीय क्षमतांचा वापर करण्याच्या दिशेनेही देशाची वाटचाल चालू आहे. जग भारताकडे ‘विश्वमित्र’ म्हणून पाहत आहे,’’ असे मोदी यांनी नमूद केले. 

सशस्त्र दलांतील महिलांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘विविध सशस्त्र दलांतील महिलांची संख्या वाढवण्यावर सरकार भर देत आहे. भारताने अनेक मोठी लक्ष्ये समोर ठेवली असून ती साध्य करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करण्यात येत आहे.’’

नौदलाची वाटचाल स्वदेशीकरणाकडे : राजनाथ

भारतीय नौदल स्वदेशीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. नौदलात पूर्वी आयात केलेल्या उपकरणांचा वापर करण्यात येत होता, आता मात्र नौदलाचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल दिनाच्या कार्यक्रमात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या गरजांना अधिक महत्त्व दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments