Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यानिवडणूकविषयक सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवावेत - निवडणूक खर्च निरीक्षक

निवडणूकविषयक सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवावेत – निवडणूक खर्च निरीक्षक

• माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे ‘पेड न्यूज’वर विशेष लक्ष
• मतदार संघाच्या सीमांवर काटेकारेपणे तपासणी करण्याचे निर्देश
• अचूक नोंदीवर निवडणूक विभागाचा विशेष भर

हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून खर्चाच्या अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना खर्चाचे निवडणूक निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत दिल्या.

हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, आयकर विभागाचे सहायक आयुक्त अशोक मंगनानी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दीपक खंदारे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक एस. एल. बोराडे, जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते, पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, उबाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे पांडे, किनवट आदिवासी प्रकल्प विभागाचे डी. आर. श्रृंगारे, हिंगोली, वसमत व कळमनुरीचे सहायक खर्च निरीक्षक सर्वश्री. एम. जी. वानखेडे, आर. ए. लांडे, एन. एस. राठोड आदी उपस्थित होते.

राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश हिंगोली, वसमत आणि कळमनुरीचे निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली व उमरखेड, किनवट आणि हदगावचे विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कमलदीप सिंह यांनी यावेळी सांगितले.
लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांचे निवडणुकीशी संबंधित स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या बँक खात्यातून दैनंदिन काढण्यात येणाऱ्या रकमेवर बारकाईने लक्ष ठेवावेत. तसेच सर्व पथक प्रमुखांनी समन्वयाने काम करावेत. इतर विभागाशी संबंधित माहिती मिळाल्यास ती माहिती संबंधित विभागास कळवावी. जेणेकरुन त्याच्यावर कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या.

उमेदवारांकडून होणारे 10 हजार रुपयावरील व्यवहार चेकने अथवा ऑनलाईन झाले पाहिजेत. यासाठी जिल्हा ॲग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी लक्ष ठेवावे. लोकसभा मतदार संघातील सर्व बँकाकडून दहा लाख रुपयावरील रक्कमेच्या व्यवहाराची माहिती दररोज खर्च नियंत्रण समितीला सादर करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा अँग्रणी बँकेचे अधिकारी हे नोडल अधिकारी असून त्यांनी दररोज अहवाल पाठविणे आवश्यक आहे. अहवाल निरंक असला तरीही तसे निरंक अहवाल पाठवावेत. तसेच सहकारी बँकेच्या व्यवहाराची दररोजची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे उपनिबंधकांनी दररोज पाठविणे आवश्यक आहे. या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे श्री. अन्वर अली सांगितले.

लोकसभा मतदार संघात कोठेही संशयास्पद अवैध मद्य विक्री व साठा, रोख रक्कमेचे वितरण, विविध साहित्य वाटप यासारखे अनुचित प्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्थिर संनियंत्रण (एसएसटी) पथकामध्ये वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग व पोलीस विभागाने प्रत्येकी एक कर्मचारी उपलब्ध करुन द्यावा. याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करावा. मतदार संघातील राज्याच्या सीमेवर असलेल्या आदिलाबाद, पिंपळगाव, उनकेश्वर व मारला गुंडा येथे तपासणी नाक्यावर सर्व संबंधित विभागाचे प्रत्येकी एक कर्मचारी उपलब्ध ठेवावा. सीमेवर येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करावी. सीसीटीव्ही मॉनिटरींग वाढवावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच एसटी बसेस व रेल्वे स्टेशन येथे तपासणी पथक नेमून रोख रक्कम, साहित्य आदी विविध बाबींची कसून चौकशी करावी, असे निर्देश श्री. अन्वर अली यांनी दिले.

तसेच जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समितीने समाज माध्यम व वृत्तपत्रातील पेड न्यूजवर लक्ष ठेवावेत. पेड न्यूजबाबत संबंधित उमेदवारांना नोटीस द्यावेत. त्याचा अहवाल दररोज खर्च नियंत्रण समितीला सादर करावा. तसेच समाज माध्यमावर येणाऱ्या पेड न्यूजबाबत काही तक्रार असल्यास जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली येथे द्यावी. तसेच सी-व्हीजील ॲपवर माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments