आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांनी ऐकी दाखवत ‘इंडिया आघाडी’च्या छताखाली एकत्र आले आहेत. या आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेसहित नव्या साथीदारांना जोडण्याचं कामही सुरु आहे. दिल्लीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची देशभरातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याविषयी चर्चा झाली. तसेच वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया आघाडी’त सोबत घेण्याबाबत नेते अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंडिया आघाडी ‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी सक्रिय
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी सक्रिय झाली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. काल मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचीही चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने प्रस्ताव मागवल्याचे बैठकीतून समोर आले आहे.
वंचित आघाडीचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे. याच महिन्यात वंचित आघाडी त्यांचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती हाती आली आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची इंडिया आघाडीची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वंचित फॅक्टर
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर दिसून आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसल्याचे दिसून आलं. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमुळे बहुतेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’च्या फॅक्टरमुळे शेतकरी नेते राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला जवळपास ४२ लाख मतदान मिळालं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू
प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा देशभरात चाहता वर्ग आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या सभेला हजारोंची गर्दी पाहायला मिळते. प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचं दोनदा नेतृत्व केलं आहे.
१९९८ साली प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ साली झालेल्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावरून पुन्हा एकदा अकोल्याच्या जागेवरून लोकसभेत पोहोचले होते. यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. प्रकाश आंबेडकरांच्या नावाचा करिष्मा देशभरात दिसून येऊ शकतो. त्याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो.