महाराष्ट्रात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन संपले आहे. मनोज जरंगे पाटील यांनी आज (शनिवार) आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार नवीन अध्यादेश दिला आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मी मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो. त्यांनी सरकारचा मार्ग स्वीकारला. कायदेशीर मार्ग काढावा लागेल असं आम्ही सांगत होतो. ज्यांच्या नोंदी नाहीत त्या सगे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.
मराठा समजाचा प्रश्न सुटणार आहे. ओबीस समाजावर देखील अन्याय होणार नाही. राज्यातील सर्व समजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. छगन भुजबळ यांना मला सांगायचे आहे की ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली, जी आरचा अभ्यास केल्यावर भुजबळ साहेबांचं देखील समाधान होइल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.