Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याउमेदवारी बदलण्याच्या चर्चेनंतर खासदार हेमंत पाटील यांचे समर्थक मुंबईत

उमेदवारी बदलण्याच्या चर्चेनंतर खासदार हेमंत पाटील यांचे समर्थक मुंबईत

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ २०० गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला गेले असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत.

हिंगोली मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबाण या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी, असा सूर निघाला होता. त्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ सोमवारी देवेन्द्र फडणवीस यांना परभणी येथे भेटले होते.

भाजपातून सुरू झालेला विरोध समोर आल्यानंतर नांदेड आणि हिंगोली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी सायंकाळी नांदेडमध्ये एक बैठक घेतली. कुठल्याही परिस्थितीत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात येऊ नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या उमेदवारीच्या विषयात भाजपाने हस्तक्षेप केल्यास नांदेडमध्ये या पक्षाचा प्रचार आम्ही करणार नाही, असा इशाराही शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांचे समर्थक प्रल्हाद इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीतील उमेदवार बदलला जाऊ नये, हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवावी, ही मागणी घेऊन नांदेड व हिंगोली मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईमध्ये पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते आपली भावना त्यांच्या कानावर टाकणार आहेत. शिवसेना पदाधिकार्‍यांनी भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर आणि इतर पदाधिकार्‍यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments